आम आदमी पक्षाच्या राज्यसभा सदस्य स्वाती मालीवाल यांनी इंडिया आघाडीतील नेत्यांच्या भेटीची मागणी करणारे पत्र लिहिले आहे. यामध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी, उबाठा गटाचे उद्धव ठाकरे, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव आणि शरदचंद्र पवार गटाचे शरद पवार यांचा समावेश आहे. स्वाती मालिवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री असलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी झालेल्या गैरवर्तनावर चर्चा करण्यासाठी भेटण्याची वेळ मागितली आहे. त्यासाठी या नेत्यांना पत्र लिहीत आपल्या पत्राचे उत्तर आणि प्रतिसादाची वाट पाहणार असल्याचे मलिवाल यांनी म्हटले आहे.
खासदार स्वाती मालीवाल यांनी हे पत्र लिहीत आपल्यावरील प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणाबाबत पत्र लिहून त्यांनाही लवकरच न्याय मिळेल, अशी आशा व्यक्त केली आहे. .
महिनाभरापूर्वी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आपल्याला मारहाण आणि शिवीगाळ करण्यात आल्याचे स्वाती यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे. तेव्हापासून आता एक महिना झाला, मी त्याच वेदना आणि एकटेपणाशी झुंजत आहे. न्यायासाठी लढताना पीडितेला ज्या प्रकाराला सामोरे जावे लागते.असे त्या म्हणाल्या आहेत.
त्यांनी पुढे लिहिले आहे की, ह्या प्रकरणामुळे त्यांना लज्जास्पद वर्तनाला आणि चारित्र्य हननाला सामोरे जावे लागले आहे, मी अशीच गप्प राहिल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल.आणि यापुढे कोणीही महिला आणि मुली उघडपणे आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबत बोलू शकणार नाहीत, त्यामुळे या संबंधित विषयावर चर्चा करण्यासाठी त्यांना इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटून जाब विचारायचा आहे.
आम आदमी पक्षाच्या खासदार स्वाती मालीवाल यांना काही दिवसांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी मारहाण झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सचिव बिभव कुमार यांनी हे गैरवर्तन केल्याचा आरोप स्वाती मालीवाल यांनी ठेवला होता. दरम्यान या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला असून बिभव कुमार यांना पोलिसांनी अटक केलेली आहे. या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.