निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली आहे. त्याबाबतचे वेळापत्रकही निवडणूक आयोगाने जारी केले आहे.निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलै रोजी मतदान होईल. त्याच दिवशी म्हणजेच 12 जुलै रोजी निकाल जाहीर केला जाईल.
या निवडणुकीसाठी येत्या 25 जून रोजी निवडणूक आयोगाकडून अधिसचून जारी केली जाईल. त्यानंतर उमेदवारांना 2 जुलैपर्यंत आपला उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. 3 जुलै रोजी अर्जांची छानणी केली जाईल. तर उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज 5 जुलैपर्यंत मागे घेता येईल. 12 जुलै रोजी या निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान होईल. सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत यासाठी मतदान करता येईल. येत्या 12 जुलै रोजीच लगेच संध्याकाळी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे. विधानसभेच्या आमदारांनी मतदानाच्या माध्यमातून नियुक्त केलेले विधानपरिषदेच्या 11 आमदारांचा कार्यकाळ येत्या 27 जुलै रोजी संपणार आहे. त्यामुळे त्यांच्या जागेवर अन्य व्यक्तींची आमदार म्हणून निवड केली जाईल.
27 जुलै रोजी कार्यकाळ संपणाऱ्या आमदारांमध्ये विजय गिरकर, निलय नाईक, रमेश पाटील, रामराव पाटील (भाजप), महादेव जानकर (भाजप मित्र पक्ष), अनिल परब (शिवसेना ठाकरे गट), मनीषा कायंदे (शिवसेना शिंदे गट), डॉ. वजाहत मिर्झा व डॉ. प्रज्ञा सातव (काँग्रेस), बाबाजानी दुराणी (राष्ट्रवादी), जयंत पाटील (शेकाप) या 11 आमदारांचा समावेश आहे.
दरम्यान, आता विधानसभेचे संख्याबळ घटल्याने निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीच्या मतांच्या कोट्यात घट झाली आहे. भाजपचा 5 जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न असेल. शिंदे गट आणि अजित पवार गटही प्रत्येकी 2 जागांसाठी प्रयत्नशील आहेत. याचाच अर्थ महायुती ९ जागांसाठी प्रयत्न करण्याची शक्यता आहे. काँग्रेसचा एक उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतो. ठाकरे गट आणि शरद पवार गटाकडे स्वबळावर उमेदवार निवडून आणण्यासाठी पुरेसे संख्याबळ नाही. पण दोघांची मते एकत्र केल्यास एक उमेदवार निवडून येऊ शकतो.