पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांचा लोकसभा मतदारसंघ वाराणसी (उत्तर प्रदेश) च्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांनी वाराणसी येथून पीएम-किसान योजनेअंतर्गत सुमारे २० हजार कोटी रुपयांचा 17 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला आहे. १७ व्या हप्त्यातून ९.२६ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना २०,००० कोटी रुपयांहून अधिकचा लाभ मिळणार आहे. वाराणसीमध्ये आज दुपारी ४.१५ वाजता पंतप्रधान मोदींनी पीएम किसान परिषदेत भाग घेतला.
पॅरा एक्स्टेंशन वर्कर्स म्हणून काम करण्यासाठी कृषी सखी म्हणून प्रशिक्षित झालेल्या ३०,००० हून अधिक स्वयं-सहायता गटांनाही पंतप्रधानांनी प्रमाणपत्रांचे वितरण केले. या कार्यक्रमात उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान आणि अनेक राज्यमंत्रीही सहभागी झाले होते. या कार्यक्रमात देशभरातील ७३२ कृषी विज्ञान केंद्रे (KVK) आणि एक लाखाहून अधिक प्राथमिक कृषी सहकारी संस्था आणि पाच लाख सामान्य सेवा केंद्रांमधील २.५ कोटीहून अधिक शेतकरी सहभागी झाले होते.