सध्या देशभरात अनेक शहरांमध्ये बॉम्ब ठेवल्याचे किंवा अन्य असे समाजामध्ये भीती पसरविणारे ईमेल येण्याचे प्रमाण वाढले आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळच्या राजा भोज विमानतळाला पुन्हा बॉम्बची धमकी मिळाली आहे. एका अज्ञात व्यक्तीने मंगळवारी राजा भोज विमानतळ प्राधिकरणाला हा धमकीचा ई-मेल पाठवला आहे. भोपाळ विमानतळाचे संचालक रामजी अवस्थी यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली.
मंगळवारी भोपाळसह देशातील सुमारे ५० विमानतळांवर बॉम्बस्फोट करण्याचा ई-मेल पाठवण्यात आल्याचे समजते आहे. ईमेल मिळताच विमानतळ प्राधिकरण सतर्क झाले. सीआयएसएफला तात्काळ अलर्ट जारी करण्यात आला आणि सतर्क राहण्यास सांगण्यात आले. तक्रारीच्या आधारे, सीआयएसएफने विश्रामगृहासह विमानतळ परिसराची कसून तपासणी केली, परंतु कोणतीही संशयास्पद बॅग, बॉम्ब किंवा वस्तू आढळून आली नाही. धोक्याची माहिती मिळताच सुरक्षा दल सतर्क झाले. यानंतर बॉम्ब थ्रेट असेसमेंट कमिटीने विमानतळावर मॅन्युअल तपासणी वाढवली आहे.
भोपाळच्या गांधीनगर पोलिसांनी कलम ५०७ आणि एअरक्राफ्ट ॲक्ट अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस स्टेशनचे प्रभारी सुनील मेहर यांनी सांगितले की, विमानतळ प्राधिकरणाला इंग्रजीत लिहिलेला मेल आला. भोपाळशिवाय इतर विमानतळांनाही टॅग करण्यात आले आहे. बॉम्बची माहिती मिळाल्यानंतर विमानतळ प्राधिकरणाने हाय अलर्ट घोषित करून सुरक्षा वाढवली. त्याचवेळी पोलिसांसह सुरक्षा दलांनी विमानतळावर तपास मोहीम राबवली. श्वानपथकाच्या मदतीने तपास करण्यात आला. तपासानंतर बॉम्ब धमकी सल्लागार समितीची बैठक झाली. या समितीमध्ये पोलीस आणि जिल्हा प्रशासनाव्यतिरिक्त आयबी आणि ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीच्या अधिकाऱ्यांचाही समावेश होता. विमानतळ आणि परिसरातील सुरक्षेचा आढावा बैठकीत घेण्यात आला.