राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांची राज्यसभा सदस्य म्हणून निवड झाल्याची घोषणा महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र भोळे यांनी केली आहे.
राज्यसभा सदस्य प्रफुल्ल मनोहरभाई पटेल यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या एका जागेसाठी (महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारे निवडून दिल्या जाणाऱ्या) ही पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. त्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची राज्यसभेवर निवड झाल्याचे घोषित करण्यात आले आहे.
सुनेत्रा पवार या एकमेव उमेदवार रिंगणात असल्याने त्यांची बिनविरोध निवड होणार हे निश्चित मानले जात होते. दरम्यान पुण्यात त्यांचे कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आले. पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला होती की, जर केंद्रात मंत्रिपदाची संधी मिळाल्यास स्वीकारणार का? यावर त्या म्हणाल्या होत्या की, मला संधी मिळाली तर मी नक्कीच संधीचा फायदा घेईन.”
त्याप्रमाणे आता सुनेत्रा पवार यांच्या निवडीमुळे बारामतीला आता ३ खासदार मिळाले आहेत. जेष्ठ नेते शरद पवार आणि त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे हे देखील राज्यसभेवर खासदार आहेत. आता पवार घरातले तीन सदस्य संसदेमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
.लोकसभा निवडणुकीमध्ये बारामतीच्या लढतीकडे महाराष्ट्राचेच नाही तर देशाचे लक्ष होते. मात्र या सामन्यात सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला होता. . बारामतीतल्या या पराभवानंतर आता सुनेत्रा पवार यांची राज्यसभा सदस्य म्हणून निवड झाली आहे. सुनेत्रा पवार या पवार असल्यामुळे सुप्रिया सुळे यांना संसदेत टक्कर देऊ शकतील. तसेच बारामतीवर अजित पवारांचं वर्चस्व ठेवण्याच्या प्रयत्नात यश मिळू शकेल असे सांगितले जात आहे.