शिवसेनेचा आज 58 वा वर्धापन दिन आहे.शिवसेनेतल्या पक्ष फुटीनंतर हा दुसरा वर्धापन दिन असणार आहे. उद्धव ठाकरेंचा उबाठा गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना आपला वेगवेगळा वर्धापन दिन साजरा करणार आहेत. शिंदेंचा वर्धापन दिन मुंबईत वरळी डोम इथे पार पडणार आहे. तर ठाकरेंच्या गटाचा वर्धापन दिन षण्मुखानंद सभागृहात होणार आहे. लोकसभा निवडणुकीचा लागलेला निकाल आणि तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर या वर्धापन दिनाला विशेष महत्त्व असणार आहे.आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचे बिगुल दोन्ही गटांचे नेते या मेळाव्यात फुंकण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.
वरळी डोम इथे पार पडणाऱ्या शिवसेनेच्यावर्धापन दिनाच्या सोहळयाला सायंकाळी पाच वाजता सुरुवात होईल. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लोकसभा निवडणूक लढवली गेली, ज्यात 15 जागांवर उमेदवार देण्यात आले होते. त्यापैकी सात जागा एकनाथ शिंदे यांनी निवडून आणल्या आहेत. जरी अपेक्षेप्रमाणे महायुतीला यश मिळाले नाही हे खरे असले तरी महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या दोन्ही पक्षांपेक्षा एकनाथ शिंदेंचा स्ट्राईक रेट हा सर्वाधिक मानला जात आहे. ह्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे जोशात उद्धव ठाकरेंवर बरसतील आणि विधासभेच्या प्रचाराचा नारळ फोडतील असे सांगितले जात आहे. तसेच या निमित्ताने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील सदस्य नोंदणी कार्यक्रम पुन्हा एकदा सुरू करण्यात येईल, तसेच संपूर्ण महाराष्ट्रात वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ आज होणार आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला मिळालेले यश आणि त्यात शिवसेना ठाकरे गटाचे निवडून आलेले नऊ खासदार. यामुळे नक्कीच ठाकरेंच्या गटाचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे वाढलेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वर्धापन दिनाचा औचित्य साधून उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वर्धापन दिनाला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे. ठाकरे कुटुंबियांसोबत ठाकरेंचे सर्व आमदार खासदार जिल्हाप्रमुख संपर्कप्रमुख आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतील.