रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन उत्तर कोरियाच्या दौऱ्यावर आले आहेत. गेल्या २४ वर्षात पुतिन उत्तर कोरियाला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. रशियन वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, पुतिन यांनी म्हटले आहे की, अमेरिकेसोबत वाढता संघर्ष पाहता दोन्ही देश निर्बंधांना सामोरे जाण्यासाठी एकत्र काम करू इच्छितात. अशा स्थितीत या भेटीदरम्यान अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होऊ शकतात.
रशियन न्यूज एजन्सी ‘आरआयए-नोवोस्ती’ आणि ‘इंटरफॅक्स’नुसार, उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी पुतीन यांचे प्योंगयांगच्या विमानतळावर भव्य स्वागत केले. उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांगमध्ये पुतिन यांचे फोटो आणि रशियन ध्वजांनी रस्ते सजवण्यात आले होते. राष्ट्रपतींसोबतच उपपंतप्रधान डेनिस मँतुरोव, संरक्षण मंत्री आंद्रेई बेलोसोव्ह आणि परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांच्यासह अनेक उच्चपदस्थ अधिकारीही या दौऱ्यावर आहेत. ही माहिती देताना पुतीन यांचे परराष्ट्र धोरण सल्लागार युरी उशाकोव्ह यांनी सांगितले की, या भेटीदरम्यान अनेक दस्तऐवजांवर स्वाक्षऱ्या केल्या जातील, ज्यामध्ये बहुधा सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीवरील कराराचाही समावेश असणार आहे.
उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांगमध्ये शिखर परिषदेसाठी रवाना होण्यापूर्वी, रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी युक्रेनवरील कारवाईला पाठिंबा दिल्याबद्दल उत्तर कोरियाचे आभार मानले आणि अमेरिकेच्या निर्बंधांविरोधात एकत्र काम करण्याबद्दल बोलले. ते म्हणाले होते की रशिया आणि उत्तर कोरिया व्यापाराच्या शक्यतांचा शोध घेतील आणि पेमेंट सिस्टम विकसित करतील जी पाश्चात्य देशांच्या नियंत्रणाखाली नसतील आणि देशांवरील निर्बंधांना संयुक्तपणे विरोध करतील. दोन्ही देश पर्यटन, संस्कृती आणि शिक्षण क्षेत्रातही सहकार्य वाढवतील.