युजीसीच्या मंगळवारी 18 जून रोजी झालेल्या नेट परीक्षेचा पेपर लीक झाल्याची शक्यता पाहता केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने काल ही परीक्षा रद्द केल्याचे जाहीर केले आहे तसेच पेपर फुटीची सीबीआयमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.ही परीक्षा पुन्हा एकदा नव्याने घेतली जाणार आहे. केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने परिपत्रक काढत यासंदर्भातील निर्णय जाहीर केला आहे.
याबाबत केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने सांगितले की, परीक्षेची पारदर्शकता आणि विश्वासार्हता टीकून राहवी म्हणून युजीसी-नेट 2024ची परीक्षा रद्द करून पुन्हा नवीन परीक्षा घेतली जाणार आहे. याची माहिती पुढील काळात जाहीर करण्यात येईल. तसेच पेपर लीक प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात येत असल्याचे शिक्षण मंत्रालयाने जाहीर केले आहे. ज्युनिअर रिसर्च फेलोशिप तसेच विद्यापीठ आणि महाविद्यालयांत सहायक प्राध्यापक पदावर नियुक्तीसाठी नेट परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक असते.
तसेच युजीसीने जून 2024 पासून विविध 83 विषयांमध्ये पीएच.डी ला प्रवेश घेण्यासाठी नेट परीक्षा अनिवार्य केली आहे. त्यामुळे दरवर्षी देशभरातील लाखो विद्यार्थी ही परीक्षा देतात. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) मार्फत ही परीक्षा घेतली जाते. मागीलवर्षी ऑनलाइन परीक्षेदरम्यान आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे 2 तास परीक्षा उशिरा सुरू झाली होती.यावर्षी अशाप्रकारचा गोंधळ होऊ नये म्हणून 18 जूनला ‘नेट’ची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने दोन शिफ्टमध्ये घेण्यात आली होती.