नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या नवल बजाज (Naval Bajaj ) यांची महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) अपर पोलिस महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सीबीआयमध्ये सहसंचालक म्हणून कोळसा घोटळ्याचा तपास नवल बजाज यांनी केला होता. त्यानंतर त्यांना पुन्हा त्यांचे मूळ केडर महाराष्ट्रात परत पाठवण्यात आले होते. लोकसभेच्या आचारसंहितेमुळे त्यांना नियुक्ती मिळाली नव्हती. अखेर त्यांची एटीएसमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.
सदानंद दाते (Sadanand Date) यांची राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) महासंचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर गेल्या तीन महिन्यांपासून महाराष्ट्र एटीएस प्रमुखांचे पद रिक्त होते. त्यामुळे एटीएस प्रमुखपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते अखेर नवल बजाज यांची या पदावर नियुक्ती करण्याचे आदेश काल गृहविभागानं जारी केले आहेत.
नवल बजाज हे १९९५ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी याआधी मुंबईत विविध महत्वाची पदे भूषवली आहेत. पुढील काही काळात ते निवृत्त होणार आहेत. बजाज यांनी अतिरिक्त पोलीस महासंचालक (आर्थिक गुन्हे) म्हणूनही काम केले आहे. तसेच त्यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (सीआयएसएफ) त्यांची प्रतिनियुक्ती करण्यात आली होती.