पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आज वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. आज सकाळी,मुर्मू वाढदिवसानिमित्त प्रथम दिल्लीतील भगवान जगन्नाथ मंदिरात पोहोचल्या आणि देशवासियांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या एक्स हँडलवर राष्ट्रपतींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “त्यांची अनुकरणीय सेवा आणि राष्ट्राप्रती समर्पण आम्हा सर्वांना प्रेरणा देते.त्यांची बुद्धी आणि गरीब आणि उपेक्षित लोकांच्या सेवेवर दिलेला भर ही एक मजबूत मार्गदर्शक शक्ती आहे. त्यांचा जीवन प्रवास करोडो लोकांना मार्गदर्शन करतो. त्यांच्या अथक प्रयत्नांसाठी आणि दूरदर्शी नेतृत्वासाठी भारत त्यांचा सदैव ऋणी राहील. त्यांना दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य लाभो”.असे पंतप्रधान आपल्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही त्यांच्या X हँडलवरून राष्ट्रपतींना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी लिहिले आहे कि, “राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा. भारताच्या सर्वांगीण विकासाअसलेल्या त्यांच्या दूरदृष्टीचा सर्वत्र आदर केला जातो.त्यांची अंतर्दृष्टी आणि योगदानाचा भारताला खूप फायदा झाला आहे. समाजातील गरीब आणि दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी आणि सक्षमीकरणासाठी त्यांची तळमळ वाखाणण्याजोगी आहे. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना”.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देत आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की “राष्ट्रपतींना वाढदिवसाच्या शुभेच्छा. राष्ट्राच्या विकासासाठी, गरीब आणि समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीसाठी त्यांचे समर्पण सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो”.प्रतिभा पाटील यांच्यानंतर द्रौपदी मुर्मू या देशाच्या दुसऱ्या महिला आणि पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती आहेत.
याचबरोबर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी एक्स वर पोस्ट करत राष्ट्रपती मुर्मू यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांचे अभिष्टचिंतन केले आहे.