आज स्वराज्याची राजधानी दुर्ग दुर्गेश्वर रायगडावर ३५१ वा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. लाखो शिवभक्त रायगडावर उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत देखील उपस्थित होते. आज रायगडावर तिथीनुसार राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी रायगडावर जय शिवाजी, जय भवानी अशा घोषणांनी आसमंत दणाणून गेले होते.
रायगड किल्ल्यावर शिवभक्तांनी विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा उचलून धरला होता. या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी उत्तर देखील दिले आहे. रायगडच्या विकासासाठी आणि शिवसृष्टीसाठी सरकारने दिलेल्या निधीबद्दल देखील शिंदे यांनी विधान केले. आई भवानी शक्ती दे विशाळगडाला मुक्ती दे अशा घोषणा रायगडावर दिल्या जात होत्या. वक्फ बोर्ड विरोधात यावेळी नाराजी व्यक्त केली जात होती. यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी देखील भाष्य केले. विशाळगडाचे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे, पण करेक्ट कार्यक्रम केला जाणार आहे, असे भाष्य एकनाथ शिंदे यांनी केले आहे.