राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ प्रचारक आणि ,विश्व हिंदू परिषदेचे विजयराव माताडे यांचे आज, गुरुवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते 67 वर्षांचे होते. नागपूरातून 18 प्रचारकांची चमू 1983 साली कार्यरूपात निघाली त्यात विजयराव माताडेंचा समावेश होता.
प्रारंभी यवतमाळ नगर प्रचारक, अचलपूर जिल्हा प्रचारक, अमरावती विभाग प्रचारक त्यानंतर संघ रचनेनुसार विश्व हिंदू परिषदेची विदर्भ प्रांताची जवाबदारी देण्यात आली. प्रारंभी बजरंग दल नंतर विश्व हिंदू परिषद विदर्भ प्रांत संघटन मंत्री म्हणून ते कार्यरत होते. तसेच 2014 पासून मुंबई क्षेत्र (महाराष्ट्र-गोवा राज्य) संघटन मंत्री म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला.
अत्यंत मनमिळाऊ सुस्वभावी व लोकसंग्रही कार्यकर्ता म्हणून त्यांचा लौकिक होता. माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी, विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य व जेष्ठ प्रचारक दिनेश्चंद्र यांनी शोक संदेश पाठवत श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या पार्थिवावर नागपुरातील गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आला.