भारताचे माजी वेगवान गोलंदाज डेव्हिड जॉन्सन यांचे आज वयाच्या ५२ व्या वर्षी बेंगळुरू येथे निधन झाले. त्यांनी 1996 मध्ये झालेल्या दोन कसोटी सामन्यामध्ये तीन विकेट घेतल्या होत्या.
बेंगळुरूमधील एका अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरील बाल्कनीतून पडून जॉन्सन यांचा मृत्यू झाला असे सांगण्यात आले आहे. त्यांच्या जवळच्या लोकांच्या म्हणण्यानुसार, जॉन्सन यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, परंतु त्यांना वाचवता आले नाही.
त्यांनी देशांतर्गत कारकिर्दीत 39 प्रथम श्रेणी सामने खेळले, ज्यात त्यांनी एकूण 125 विकेट घेतल्या होत्या.
जॉन्सन हे सर्वात वेगवान भारतीय गोलंदाजांपैकी एक होते आणि त्यांनी देशांतर्गत केलेल्या कामगिरीने (1995-96 रणजी ट्रॉफी हंगामात केरळविरुद्ध 152 धावांत 10 बळी) त्यांना भारतीय संघात स्थान मिळवून दिले होते.1996 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध नवी दिल्ली येथे झालेल्या एकमेव कसोटीतून त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यात त्यांना मायकल स्लेटरला बाद करण्यात यश आले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात जॉन्सन यांच्या कारकिर्दीतला वेग १५७.८ किमी/तास होता. ते दक्षिण आफ्रिका दौऱ्याचा एक भाग होते.मात्र त्यांना फक्त पहिल्या कसोटीत खेळण्याची संधी मिळाली, ज्यामध्ये त्यांनी हर्शेल गिब्स आणि ब्रायन मॅकमिलन यांच्या विकेट घेतल्या होत्या.
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. शाह यांनी लिहिले आहे की , “आमचा माजी भारतीय वेगवान गोलंदाज डेव्हिड जॉन्सन यांच्या कुटुंबीय आणि मित्रांप्रती मनापासून शोक व्यक्त करतो. खेळातील त्यांचे योगदान नेहमीच लक्षात ठेवले जाईल.”
भारताचे माजी प्रशिक्षक आणि दिग्गज लेगस्पिनर अनिल कुंबळे यांनी लिहिले आहे की , “माझे क्रिकेट पार्टनर डेव्हिड जॉन्सनच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झाले. त्यांच्या कुटुंबाप्रती हार्दिक शोक व्यक्त करतो. खूप लवकर गेला “बेनी”! असे म्हणत कुंबळे यांनी शोक व्यक्त केला आहे.