ओबीसी समाजाच्या हक्कासाठी लक्ष्मण हाके हे गेले ८ दिवसांपासून आंदोलन करत आहेत. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी ते आंदोलन करत आहेत. लक्ष्मण हाके यांच्यासोबत नवनाथ वाघमारे हे देखील आंदोलन करत आहेत. दरम्यान तब्बल ९ दिवसानंतर राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने हाके व वाघमारे यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र हाके आणि वाघमारे आंदोलनावर ठाम असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गिरीश महाजन यांच्या फोनवरून हाके यांच्याशी चर्चा केली आहे.
दरम्यान या सर्व प्रकाणावर तोडगा काढण्यासाठी आज मुख्यमंत्र्यांच्या सह्याद्री निवासस्थानावर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत काय तोडगा निघतो हे पाहणे महत्वाचे असणार आहे. दरम्यान सरकारच्या शिष्टमंडळाने लक्ष्मण हाके यांची भेट घेतली. यावेळी इतके दिवस उपोषण करणे आरोग्याला घातक आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी सरकारची भूमिका आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून निर्णय करू. हाके यांनी त्यांचे शिष्टमंडळ मुंबईला पाठवावे, असे मंत्री गिरीश महाजन म्हणाले आहेत.
दरम्यान यावर बोलताना लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षण आणि सगेसोयऱ्यांबाबत याबाबत नक्की भूमिका घ्यावी असे म्हटले आहे. कुणबी प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम थांबवण्याची विनंती त्यांनी केली आहे. त्यामुळे आता सरकार जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनावर काय तोडगा काढणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.