प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या ‘हमारे बारह’ चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनावर यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने बंदी घातली होती. याचिकाकर्त्यांच्या आक्षेपानंतर निर्मात्यांनी चित्रपटातील काही आक्षेपार्ह संवाद आणि दृश्ये काढून टाकण्याची तयारी दर्शवली आहे. शुक्रवारी 21 जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित करण्यास हायकोर्टाने मंजुरी दिली आहे.
सुरुवातीला या चित्रपटात काही आक्षेपार्ह गोष्टी असल्याने त्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. ७ जून रोजी प्रदर्शित होण्यापूर्वी या चित्रपटावर मुंबई उच्च न्यायालयाने बंदी घातली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात चित्रपट निर्मात्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र तेथून हे प्रकरण पुन्हा उच्च न्यायालयात सुनावणीसाठी पाठवण्यात आले. नंतर, उच्च न्यायालयाने चित्रपटातील काही आक्षेपार्ह संवाद आणि दृश्ये काढून टाकल्यानंतर आणि चित्रपटाच्या कमाईचा काही भाग धर्मादाय म्हणून देण्यास सहमती दर्शवल्यानंतर चित्रपट प्रदर्शित करण्यास परवानगी दिली.
न्यायालयाच्या या निर्णयाचे चित्रपट निर्मात्यांनी स्वागत केले आहे. न्यायालयाच्या अटींचे पालन करूनच हा चित्रपट २१ जूनला प्रदर्शित होणार असल्याचे त्यांनी सांगितले. हा चित्रपट सर्व धर्मांसाठी आहे. कोर्टाच्या सूचनेनुसार आम्ही टीझरही रिलीज केला होता पण आता लवकरच नवीन टीझर रिलीज करणार आहोत. न्यायालयानेही आमच्या चित्रपटाचे कौतुक केले आहे. एका मिनिटाचा टीझर पाहून तुम्ही संपूर्ण चित्रपटाला न्याय देऊ नका, असेही न्यायालयाने म्हटले आहे, असे त्यांनी सांगितले. हा चित्रपट महिलांच्या विरोधात नसून महिलांसाठी आहे. ‘हमारे बारह’ या चित्रपटात अन्नू कपूर, मनोज जोशी आणि अश्विनी काळसेकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.