राज्यात मराठा-ओबीसी संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. ओबीबी समाजासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे गेल्या ९ दिवसांपासून वडीगोद्री (जालना) येथे आंदोलन करत आहेत. दरम्यान उपोषण करत असताना हाके यांनी काही मागण्या केल्या होत्या. अखेर राज्य सरकारने लक्ष्मण हाके यांच्या मागण्या मान्य केल्याने त्यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे.
ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही. यासह इतर मागण्या देखील राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांच्या भेटीला गेले होते. या शिष्टमंडळाने ओबीसी आरक्षणावर राज्य सरकारची भूमिका काय आहे याची माहिती हाके यांना दिली. त्यानंर शिष्टमंडळाने लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आपले उपोषण मागे घेण्याची विनंती केली.
दरम्यान यावेळी भुजबळ देखील चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. उपोषणस्थळावरून बोलताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले, ”आम्ही कोणालाही धमक्या देत नाही. आम्ही कुणाला घाबरत नाही. आपली लढाई अजून संपलेली नाही. त्यांना द्यायचे तर दुसरे ताट द्या. आमच्या ताटातले देऊ नका. लोकशक्ती एकत्रित आली तर धनशक्तीचा पराभव होईल. त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या. आम्ही पाठिंबा देतो. शरीफ है हम. किसी से लडते नाही है. पर जमाना जानता है, किसी के बाप से डरते नाही है.” छगन भुजबळ असे म्हणतात समोर उपस्थित असलेल्यांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली आहे.