लातूर, २३ जून : नीट पेपरफुटी प्रकरण समोर आल्याने होणारी नीट पीजी परीक्षा पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय आरोग्य मंत्रालयाने घेतला आहे. यात बिहारमधील कारवाईनंतर आता महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना नांदेड एटीएसने ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांपैकी एक जण लातूर, तर दुसरा सोलापूर येथे कार्यरत असल्याची माहिती मिळत आहे. संजय तुकाराम जाधव आणि जलील उमरखाँ पठाण अशी या शिक्षकांची नावं आहेत. दोघेही जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. दरम्यान पेपरफुटी प्रकरणात या दोघांचा सहभाग असल्याचा संशय असून एटीएसकडून दोघांचीही कसून चौकशी सुरू आहे.
वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या परीक्षेत (नीट) घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. लातूरमध्येही नीट आणि जेईईच्या तयारीसाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी खासगी कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेत असतात. त्यामुळे परीक्षा गैरव्यवहारात या शहराचे काही धागेदोरे आहेत का? या दृष्टीनं तपास सुरू होता. शनिवारी रात्री नांदेड एटीएसच्या हाती हे दोघे शिक्षक लागले. दोघांनाही तात्काळ एटीएसकडून ताब्यात घेण्यात आले.
अधिक माहिती अशी की, लातूरमध्ये राहणारे संजय जाधव हे मूळचे बोथी तांडा (ता. चाकूर) येथील रहिवासी आहेत. सध्या सोलापूरच्या टाकळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत आहेत. तर लातूरच्या अंबाजोगाई रोड भागात राहणारे जलील उमरखाँ पठाण हे तालुक्यातील कातपूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. हे दोघेही लातूर येथे खाजगी कोचिंग क्लासेस चालवत होते, अशी माहिती आहे.