संसदेचे अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. मोदी 3.0 सरकारचे हे पहिलेच अधिवेशन असणार आहे.अधिवेशनाच्या सुरवातीच्या सत्रात पंतप्रधान आणि काही सदस्यांनी लोकसभेचे निर्वाचित सदस्य म्हणून शपथविधी चालू आहे. नवीन संसद भवनात ह्यावेळी पहिल्यांदाच अधिवेशन पार पडणार आहेत. आज पंतप्रधान मोदी यांच्यासह कॅबिनेट मंत्री आणि 280 खासदार यांचा लोकसभेचे सदस्य म्हणून शपथविधी पार पडत आहे.
संसदेत जाण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी आणि माध्यमांशी संवाद साधला. आम्हाला तिसऱ्यांदा जनतेने संधी दिली आहे. त्यामुळे आमची जबाबदारी अधिक वाढली आहे. आम्ही तीनपट अधिक काम करु. विरोधी पक्षाकडून जनतेच्या अनेक अपेक्षा आहेत. देशातील जनतेने दिलेली जबाबदारी सर्वांनी पूर्ण करावी, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी म्हटले आहे.तसेच सर्वांना सोबत घेऊन भारत मातेची सेवा करणार असल्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे.
या अधिवेशनाच्या पहिल्या तीन दिवसांत नवनिर्वाचित सदस्य शपथ घेणार आहेत. यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 27 जून रोजी लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार आहेत. नव्या सरकारच्या पाच वर्षांच्या कामाची रूपरेषाही त्या सादर करतील. 27 जून रोजी राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर पंतप्रधान मोदी संसदेत त्यांच्या मंत्रिमंडळाच्या सदस्यांची ओळख करून देणार आहेत असे सांगितले जात आहे. . राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेदरम्यान आक्रमक विरोधक विविध मुद्द्यांवर एनडीए सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करू शकतात. दरम्यान राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर संसदेच्या दोन्ही सभागृहात झालेल्या चर्चेला पंतप्रधान उत्तर देतील.