सौदी अरेबियात यावर्षी प्रचंड उष्णतेमुळे मोठ्या संख्येने हज यात्रेकरूंना आपला जीव गमवावा लागला आहे. रविवारी या संदर्भात सौदी अरेबियाकडून माहिती देण्यात आली की, हज यात्रेदरम्यान या वर्षी किमान 1301 लोकांचा मृत्यू झाला आहे. प्रचंड उकाड्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांना जीव गमवावा लागला आहे. गेल्या सोमवारी मक्कामध्ये ५१.६६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. मृतांमध्ये 98 भारतीय प्रवाशांचाही समावेश आहे. इजिप्शियन लोकांचा सर्वाधिक मृत्यू झाला आहे.
सौदी अरेबिया सरकारने जारी केलेल्या माहितीनुसार, यंदाच्या अति उष्णतेचा आरोग्य व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. दुर्दैवाने, या काळात 1,301 लोक मरण पावले आहेत. सौदी अरेबियाचे आरोग्य मंत्री फहद बिन अब्दुररहमान अल-जलाझेल यांच्या म्हणण्यानुसार, मरण पावलेल्यांपैकी 83 टक्के हे हज यात्रेसाठी
अनधिकृत होते आणि पुरेसा निवारा किंवा विश्रांती न घेता थेट सूर्यप्रकाशात लांब अंतरावर चालत होते. मृतांमध्ये वृद्ध आणि दीर्घकाळ आजारी लोकांचाही समावेश आहे. मरण पावलेल्यांकडे अधिकृत कागदपत्रे नसल्यामुळे ओळख प्रक्रियेस विलंब झाला होता, परंतु आता सर्व मृतांची ओळख पटली आहे.