काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज केंद्र सरकारवर टीका केली आणि सारखा आणीबाणीचा तोच तोच मुद्दा उपस्थित करून सरकार किती काळ चालवणार आहात असा प्रश्नही एनडीए सरकारला विचारला आहे.
लोकसभेच्या 18 व्या अधिवेशनाच्या सुरुवातीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकारांशी साधलेल्या संवादाबाबत खर्गे यांनी टीका केली आहे.
लोकसभा खासदार म्हणून शपथ घेण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनाबाहेर माध्यमांना संबोधित करताना NEET परीक्षेतील कथित अनियमितता, मणिपूर हिंसाचार आणि पश्चिम बंगाल रेल्वे अपघात यासारख्या मुद्द्यांचा उल्लेख न केल्याबद्दल त्यांनी पंतप्रधानांना लक्ष्य करण्यासाठी सोशल मीडियाचा देखील आधार घेतला.
“ते NEET आणि इतर प्रवेश परीक्षांमधील पेपर लीकबद्दल तरुणांबद्दल थोडी सहानुभूती दाखवतील, परंतु ते त्यांच्या सरकारच्या हेराफेरी आणि भ्रष्टाचाराची कोणतीही जबाबदारी घेणार नाहीत ” असे खर्गे म्हणाले आहेत. .
“पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या रेल्वे अपघाताबाबत मोदीजीही मौन बाळगून होते. मणिपूर गेल्या 13 महिन्यांपासून हिंसाचाराच्या गर्तेत आहे, पण मोदीजी तिथे गेले नाहीत किंवा त्यांनी आजच्या भाषणात नुकत्याच झालेल्या हिंसाचाराबद्दल कोणतीही चिंता व्यक्त केली नाही,”असे खर्गे म्हणाले आहेत.
खर्गे यांनी आपल्या पोस्टमध्ये आसाममधील पूरस्थिती आणि प्रदीर्घ प्रलंबित जनगणनेचा मुद्दाही उपस्थित केला.
आसाम आणि ईशान्येत पूर आला आहे, महागाई, रुपयाची घसरण, एक्झिट पोल-स्टॉक मार्केट घोटाळा असे मोदींनी बोलण्यासारखे अनेक मुद्दे होते. तसेच मोदी सरकारने पुढची जनगणना दीर्घकाळ प्रलंबित ठेवली आहे;
“मोदीजी , तुम्ही विरोधकांना सल्ला देत आहात. तुम्ही आम्हाला 50 वर्ष जुन्या आणीबाणीची आठवण करून देत आहात, परंतु गेल्या 10 वर्षांच्या अघोषित आणीबाणीचा विसर पडला आहे जी जनतेने संपवली निवडणुकीमध्ये आहे ,” असे खर्गे म्हणाले आहेत.
“लोकांनी मोदीजींच्या विरोधात जनादेश दिला आहे. असे असूनही ते पंतप्रधान झाले असतील तर त्यांनी काम केले पाहिजे.लोकांना नुसत्या घोषणा नको आहेत तर कामही हवे आहे हे लक्षात असू द्यात”असे खर्गे मोदींना उद्देशून म्हणाले आहेत.