लवकरच आळंदीतून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढपूरसाठी प्रस्थान करणार आहे. मात्र वारीची तारीख जवळ आली असली तरी अजूनही इंद्रायणी नदी फेसाळलेलीच आहे. यामुळे वारकऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे. गेल्या काही वर्षांपासून इंद्रायणी नदीचा हा प्रश्न सरकार दरबारी प्रलंबितच आहे. त्यामुळे आता पालखी प्रस्थान सोहळ्यापूर्वी जर का इंद्रायणी नदीने मोकळा श्वास घेतला नाही तर, एकही राजकीय नेत्याला आळंदीत फिरकू देणार नाही असा इशारा वारकऱ्यांनी दिला आहे.
संत ज्ञानेश्वर पालखी प्रस्थान सोहळा काही तासांवर येऊन ठेपला असताना, अजूनही इंद्रायणी नदी फेसाळलेली आहे. पिंपरी चिंचवड मधील काही कंपन्यांनी आपले दूषित पाणी सोडल्यामुळे नदी अजूनही फेसाळलेली आहे. मात्र अजूनही या कंपन्यांचा बंदोबस्त सरकारला करणे शक्य झालेले नाही. यामुळे वारकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. गावकरी आणि वारकऱ्यांकडून इंद्रायणी नदी मोकळा श्वास घेऊ द्या, या मागणीकडे सरकारकडून सतत दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे आता इंद्रायणी नदी स्वच्छ करण्यासाठी सरकार काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.