विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरामध्ये गेले काही दिवस अमली पदार्थ विक्रीचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी बेकायदेशीर पब्जवर कठोर कारवाई करावी. तसेच अमली पदार्थांशी निगडित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवावा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना दिले आहेत.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना कठोर निर्देश दिले आहेत.पुणे शहरातील बेकायदेशीर पब्जवर कठोर कारवाई करावी. अमली पदार्थ विक्रेत्यांविरुद्ध नव्याने कठोर कारवाई सुरु करावी.यासंदर्भातील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवून कठोर कारवाई करावी. पुणे शहराला अमली पदार्थमुक्त शहर करण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय योजावेत,असे निर्देशही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले आहेत.
पुण्यात एका हॉटेलमध्ये काही तरुण वॉशरुममध्ये बसून ड्रग्स घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. हे प्रकरण ताजे असतानाच आता दोन तरुणी ड्रग्स घेत असल्याचाही व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
त्याचबरोबर पुणे शहरात रात्री उशीरापर्यंत सुरू असणाऱ्या पार्ट्यांमध्ये ड्रग्ज घेतले जात असल्याचे स्टिंग ऑपरेशन समोर आले होते. एफसी रोडवरील L3 – Liquid Leisure Lounge हॉटेलमध्ये शनिवारी पहाटे 5 वाजेपर्यंत पार्टी सुरू असल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती.हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.लगेचच हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल माने आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचेही निलंबन करण्यात आले आहे.