सध्या राज्यात आरक्षणावरून मराठी आणि ओबीसी समाजात संघर्ष होताना दिसत आहे. मनोज जरांगे पाटील विरुद्ध छगन भुजबळ, लक्ष्मण हाके असा संघर्ष पाहायला मिळतोय. दरम्यान जरांगे पाटील यांनी सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबाजवणी करण्यासाठी १३ जुलैची मुदत दिली आहे. दरम्यान ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बोगस कुणबी दाखल्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. आता लक्ष्मण हाके यांच्य्या एका सहकाऱ्याने बोगस कुणबी दाखले रद्द करण्यासाठी पहिले पाऊल उचलले आहे.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे सहकारी सतीश कुलाल यांनी मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी दाखले तपासण्यासाठी माहितीच्या अधिकारातून कागदपत्रे मागविण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी त्यांनी अर्ज देखील दाखल केला आहे. जरांगे पाटलांनी एकही कुणबी दाखल रद्द झाला तर लक्षात ठेवा असा इशारा सरकारला दिला होता. अंतर हाके यांचे सहकारी कुलाल यांनी बोगस कुणबी दाखल्यांच्याविरुद्ध कायदेशीर पाऊल उचलल्याचे पाहायला मिळत आहे.
अंतरवाली सराटी येथील काही नागरिकांनी ओबीसी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तसेच या गावातील अनेक नागरिकांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला परवानगी देऊ नये अशी मागणी केली आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटीच्या दौऱ्याला महत्व प्राप्त झाले आहे. दरम्यान पोलीस यंत्रणा देखील सज्ज झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसीमधूनच आम्हाला आरक्षण हवे अशी मागणी सरकारकडे केली आहे. मात्र ओबीसी समाजातील नेत्यांनी या मागणीला जोरदार विरोध केला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत जर हा प्रश्न सुटला नाहीतर हा संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.