आज आणीबाणीला ५० वर्षे पूर्ण होत असताना उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत की की, काँग्रेस पक्षाचा चेहरामोहरा बदलला असेल पण त्याचे मूळ स्वरूप 1975 प्रमाणेच आहे. कारण आजही ते भारताच्या संविधानाला, भारतीय लोकशाहीला शिव्याशाप देतात आणि तसेच त्यांना देशाची आणि जनतेची अजिबात काळजी नाही हे त्यांच्या भूमिकांमधून नेहमीच दिसत असते.
काल आपल्या शासकीय निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, आजच्याच दिवशी बरोबर 50 वर्षांपूर्वी एक काळा अध्याय रात्री लिहिला गेला, जेव्हा तत्कालीन काँग्रेस सरकारने भारताच्या संविधानाचा गळा दाबून टाकला होता 25 जून 1975 रोजी रात्रीच्या अंधारात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने भारताची लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळच्या सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आले. त्यातच अटलबिहारी वाजपेयी, मोरारजी देसाई, जयप्रकाश नारायण, लालकृष्ण अडवाणी यांच्यासह सर्व विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न झाला.
आज 50 वर्षांनंतर जेव्हा आपण आणीबाणीची आठवण करतो तेव्हा साहजिकच काँग्रेसमधील चेहरे बदलले असतील.पण त्यांची भूमिका तीच आहे. 1975 मध्ये दिसलेला काँग्रेसचा रानटी चेहरा आजही आहे. त्यावेळी संविधानाचा आत्मा नष्ट करण्याचे काम केले होते. देशातील नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर मर्यादा आल्या. न्यायालयाचे अधिकार ओलिस ठेवले होते. आजही काँग्रेस पक्षाचे नेतृत्व बदलले असले तरी त्यांचे चरित्र तेच आहे. ते देशात लोकशाहीची हाक देतात पण भारताबाहेर जाऊन त्यांनी भारताच्या लोकशाहीला अडचणीत आणतात. भारताच्या निवडणूक व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करतात. ते देशाबाहेर जाऊन भारताला आणि तेथील लोकशाहीला शिव्याशाप देतात. ते भारतातील प्रत्येक निवडणुकीच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण करतात आणि त्यांच्या निष्क्रियतेसाठी इतरांना दोष देण्याचा प्रयत्न करतात.असे योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, संविधान स्वीकारल्यानंतर केवळ दोन वर्षांनी जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 लागू करून काँग्रेसने देशाच्या अखंडतेला आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. एवढेच नाही तर कधी माध्यमांवर, तर कधी राजकारण्यांवर बंधने लादली आणि शक्य तितक्या मार्गांनी लोकशाहीचे सर्व स्तंभ कमकुवत करण्याचा प्रयत्न केला.
काँग्रेस आजही त्याच पद्धतीने काम करत आहे. बंगाल, केरळ आणि तामिळनाडूमधील तृणमूल काँग्रेसचे सरकार असो की ज्या राज्यांमध्ये काँग्रेसचे सरकार चालते, त्या राज्यांचा कारभार पाहता काँग्रेसचा तोच रानटी चेहरा आजही दिसून येतो. आजही हे लोक जनतेची दिशाभूल करत आहेत. ते संविधानाच्या नावाखाली संसदेच्या कामकाजात व्यत्यय आणत आहेत.
ह्या लोकांनी कधी स्वतःच्या आत डोकावून पाहावे की त्यांनी संविधानाचे खरेच पालन केले आहे का? आणिबाणीसाठी देशातील जनता काँग्रेसला कधीही माफ करणार नाही. उलट आणीबाणीला ५० वर्षे पूर्ण होत असताना काँग्रेसने देशातल्या जनतेची माफी मागायला हवी असा सल्ला योगींनी काँग्रेसच्या नेतृत्वाला दिला आहे.