बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी रविवारी, 23 जून रोजी लग्न केले आणि नवीन आयुष्याला सुरुवात केली. सोनाक्षी आणि झहीरने कुटुंबीय आणि काही नातेवाईकांच्या उपस्थितीत नोंदणीकृत विवाह केला. लग्नानंतर सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नाचे रिसेप्शन मुंबईत पार पडले. त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनचे फोटो आणि व्हिडिओही व्हायरल झाले होते. सोनाक्षीच्या लग्नाला बॉलिवूड सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती. मात्र, लग्नात तिचे जुळे भाऊ लव आणि कुश कुठेही दिसले नाहीत.
सोनाक्षीने नोंदणीकृत विवाहाद्वारे झहीरशी लग्न केले. त्यांच्या लग्नाला सोनाक्षीचे आई वडील शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा उपस्थित होते. मुलीच्या लग्नात पालक भावूक होताना दिसले. मात्र, सोनाक्षीचे भाऊ कुठेही ह्या कुटुंबाच्या आनंदात सहभागी होताना दिसले नाहीत. नोंदणीकृत विवाहादरम्यान किंवा लग्नाच्या रिसेप्शनमध्येही नाही. बहिणीच्या लग्नात भाऊ का नव्हते ? हा प्रश्न सर्वांच्याच मनात होता. सोशल मीडियावरही त्यांच्या चर्चा रंगल्या होत्या. आता अखेर सोनाक्षीचा भाऊ लव सिन्हा याने मौन तोडले आहे.
मीडियाशी बोलताना लवने आपल्या बहिणीच्या लग्नात न येण्यामागचे कारण सांगितले. तो म्हणाला, “कृपया मला एक-दोन दिवस द्या. जर मला वाटत असेल की मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकेन, तर मी नक्की तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईन. विचारल्याबद्दल धन्यवाद.”
सोनाक्षीला दोन भाऊ आहेत. ते जुळे असून लव आणि कुश अशी त्यांची नावे आहेत. सिन्हा कुटुंबीयांच्या बंगल्याचे नाव ‘रामायण’ आहे. आंतरधर्मीय विवाहाबाबत अनेक लोक सोनाक्षीला ट्रोल करत आहेत. एवढेच नाही तर त्यांच्या लग्नामुळे कुटुंबीयांमध्ये नाराजी असल्याचेही सांगितले जात आहे.