लोकसभा निवडणुकीपासून बॉलिवूड क्वीन कंगना राणावत सतत चर्चेत असते. हिमाचल प्रदेशातील मंडी येथून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवून कंगना खासदार बनली आणि संसद भवनात पोहोचली. नुकतेच कंगनाने लोकसभा अधिवेशनात खासदार म्हणून शपथ घेतली. आता खासदार झाल्यानंतर कंगना इंदिरा गांधींच्या रुपात चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाची रिलीज डेट नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.
कंगनाचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट ऑक्टोबर २०२३ मध्ये रिलीज होणार होता. मात्र त्यानंतर चित्रपटाची रिलीज डेट बदलून 24 नोव्हेंबर करण्यात आली. त्यानंतरही चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली. हा चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित होणार असल्याचे बोलले जात होते मात्र काही कारणांमुळे चित्रपटाची रिलीज डेट पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली.
कंगना राणावत स्टारर ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. येत्या 6 सप्टेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आता कंगनाच्या या लोकप्रिय चित्रपटासाठीची चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे.
‘इमर्जन्सी’ हा चित्रपट भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर भाष्य करेल. आजच्या दिवशी म्हणजे २५ जून १९७५ रोजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात अंतर्गत आणीबाणी जाहीर केली होती. त्याला आज ५० वर्ष पूर्ण होत आहेत. इंदिरा गांधी यांच्या या एका निर्णयाने देशात खळबळ उडाली होती.काँग्रेसच्या राजवटीला विरोध करणाऱ्या हजारो नेते, कार्यकर्त्यांना मिसा कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती.अनेक संघटनांवर बंदी घालून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. . प्रसार माध्यमांवर निर्बंध घालण्यात आले.आता याच सगळ्या घटनांवर आधारित 1975 चा आणीबाणीचा काळ इमर्जन्सी या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन कंगना राणावतने केले असून ती इंदिरा गांधी यांची प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात कंगनासोबत श्रेयस तळपदे, भूमिका चावला, अनुपम खेर, सतीश कौशिक , मिलिंद सोमण महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत.