राज्यात लवकरच विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे. दरम्यान राजधानी दिल्लीमध्ये जेपी नड्डा यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची अनेक मुरूडयांवर खलबते झाल्याची बातमी समोर येत आहे. दिल्लीत भाजपाची महत्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत विधानपरिषद उमेदवारांच्या नावावर चर्चा झाल्याची शक्यता आहे.
११ जुलै रोजी १२ जागांसाठी विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे. त्यासाठी भाजपा आपले ५ उमेदवार देणार आहे. मात्र भाजपमधील अनेक जण इच्छुक असल्याने कोणाची निवड करायची याचा पेच भाजपासमोर आहे. विधानसभा निवडणुकीला जे उमेदवार प्रभाव पाडू शकतात किंवा त्यासाठी जे फायदेशीर ठरू शकतात अशा उमेदवारांची निवड केली जाऊ शकते.
येत्या २ ते ४ दिवसांत भाजपा आपल्या उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे. त्यासोबतच या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत देखील चर्चा झाली आहे. विधानसभा निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो. तसेच काही विद्यमान मंत्र्यांना डच्चू देखील दिला जाऊ शकतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील दोन दिवसांपूर्वी अचानक दिल्लीत दाखल झाले होते. अमित शाह आणि त्यांची गुप्त भेट झाली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरच विधानसभा निवडणूक व मंत्रिमंडळ विस्तार याबाबत महत्वाचा निर्णय भाजपकडून येण्याची शक्यता आहे.