लोकसभेतील विरोधी पक्षनेता कोण असणार या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला असून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे नाव नक्की करण्यात आले आहे. .राहुल गांधी यांच्या निवडीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी काल मंगळवारी झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यानंतर प्रोटेम स्पीकर भर्तृहरि महताब यांनी पत्र पाठवून याबाबत कळवण्यात आले आहे.
खर्गे यांच्या घरी झालेल्या इंडी आघाडीच्या बैठकीनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार केसी वेणुगोपाल म्हणाले की, या बैठकीत राहुल गांधी यांना सभागृहात विरोधी पक्षनेते बनवण्याबाबत चर्चा झाली. या संदर्भात काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रोटेम स्पीकरना पत्र लिहून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी असतील अशी माहिती कळवली आहे. इतर पदाधिकाऱ्यांबाबत नंतर निर्णय घेतला जाईल असे वेणुगोपाल यांनी सांगितले आहे.
काँग्रेस कार्यकारिणीच्या (सीडब्ल्यूसी) 9 जून रोजी झालेल्या बैठकीत राहुल गांधी यांना लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदी नियुक्त करावे असा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. या बैठकीनंतर राहुल गांधी यांनी विचार करण्यासाठी वेळ मागितला होता. त्यानंतर आज, मंगळवारी खर्गे यांच्या निवासस्थानी झालेल्या इंडी आघाडीच्या बैठकीत राहुल गांधी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.