18 व्या लोकसभेचा अध्यक्ष निवडण्यासाठी आज निवडणूक पार पडली असून सलग दुसऱ्यांदा ओम बिर्ला यांना लोकसभेच्या अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा अध्यक्षपदासाठी ओम बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता . ओम बिर्ला यांच्या अध्यक्षपदाला 13 पक्षांनी समर्थन दिले. ओम बिर्ला यांनी लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडीचे के. सुरेश यांच्याशी सामना करावा लागला. पण आवश्यक संख्याबळ नसल्याने के सुरेश यांचा पराभव झाला.
लोकसभेच्या पहिल्या सत्राचा आज तिसरा दिवस आहे.पहिल्या दोन दिवसाच्या कामकाजात नवनिर्वाचित खासदारांना सदस्यत्यावाची शपथ देण्यात आली. सोबतच लोकसभा अध्यक्षपदाच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ओम बिर्ला आणि इंडिया आघाडीकडून काँग्रेस उमेदवार के सुरेश रिंगणात होते. ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी निवड एक ऐतिहासिक क्षण आहे. तसेच भाजपमधील सलग दुसऱ्यांदा एकाच व्यक्तीची लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड होण्याची ही पहिली वेळ आहे.
आवाजी मतदानाने ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ओम बिर्ला यांना शुभेच्छा दिल्या आणि अध्यक्षपदाचे आसन ग्रहण करण्यासाठी त्यांना सुचवले.