दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. अरविंद केजरीवाल यांना आज सीबीआयने अबकारी धोरण प्रकरणात अटक केली आहे. केजरीवाल सध्या तिहार तुरुंगात आहेत. त्यांना २१ मार्च रोजी ईडीने अटक केली होती. अरविंद केजरीवाल यांच्या जामीन याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. त्याआधी सीबीआयने त्यांना अटक केली आहे.
अरविंद केजरीवाल यांची न्यायालयात चौकशी करण्याची आणि त्यांच्या अटकेसाठी असलेली कागदपत्रे सादर करण्याची राऊस एव्हेन्यू न्यायालयाने सीबीआयला परवानगी दिल्यानंतर ही अटक करण्यात आली आहे.
केजरीवाल यांना आज सकाळी सीबीआयने अबकारी धोरण खटल्याच्या सुनावणीसाठी राऊस एव्हेन्यू कोर्टात आणले जेथे केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवालही त्यांच्यासोबत होत्या.
अरविंद केजरीवाल यांना २१ मार्च रोजी अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने अटक केल्यापासून ते तिहारच्या तुरुंगांमध्ये आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी १० मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केल्यावर ते बाहेर आले होते. त्यानंतर त्यांनी मुदत संपताच आत्मसमर्पण केले होते.
याआधी दिल्ली हायकोर्टाने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्याच्या ट्रायल कोर्टाच्या आदेशाला स्थगिती दिली होती. हा आदेश देताना दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, ट्रायल कोर्टाने उच्च न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात असा कोणताही निष्कर्ष द्यायला नको होता.