ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको यासाठी उपोषण सुरु केले होते. मात्र त्यांच्या मागण्या राज्य सरकारकडून मान्य झाल्याने त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले होते. राज्यात सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा-ओबीसी संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर लक्ष्मण हाके आणि सहकारी नवनाथ वाघमारे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. आजपासून ते आपल्या अभिवादन यात्रेला सुरुवात करणार आहेत.
लक्ष्मण हाके आपल्या अभिवादन यात्रेची सुरुवात राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ असलेल्या सिंदखेड राजा येथून करणार आहेत. लहुजी जाधव यांच्या राजवाड्यात जाऊन हाके जिजाऊ माँसाहेबांना अभिवादन करणार आहेत. तिथून त्यांची अभिवादन यात्रा वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे जाणार आहे. आपल्या या यात्रेमध्ये ते विविध श्रद्धास्थानांना भेटी देणार असून, अभिवादन यात्रेची सांगता ही अहमदनगरमधील चोंडी येथे होणार आहे.