कोरोनासारख्या भयानक विषाणूचा धोका आता कुठे कमी झाला आहे. मात्र पुणे शहरात आता झिका व्हायरसने डोके वर काढले आहे. पुण्यनगरीत ३० व १ जुलै रोजी वारीचे आगमन होणार आहे. दरम्यान लाखो वारकरी यानिमित्त पुण्यनगरीत येणार आहेत. त्यातच झिका व्हायरसने तोंड वर काढल्याने प्रशासनाचे टेन्शन वाढले आहे. याला कारण ठरले आहे ते म्हणजे पुण्यात झिका व्हायरसचे दोन रुग्ण आढळून आले आहेत.
पुण्यात झिकाचे रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील डॉक्टर आणि त्याच्या मुलीला झिकाची लागण झाली आहे. झिका व्हायरसची लागण झाल्यास ताप आणि अंगदुखी अशी लक्षणे जाणवतात. हा आजार डासांच्या उत्पत्तीमुळे होतो. गरोदर महिलांना या व्हायरसचा जास्त धोका असल्याचे म्हटले जाते. सध्या पावसाळी हवा व बदलते वातावरण यामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, झिका व इतर साथीचे रोग होण्याची शक्यता जास्त असते.