विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काल लोकसभेत केलेल्या अनेक आक्षेपार्ह टिप्पण्या रेकॉर्डवरून हटवण्यात आल्या आहेत. राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात हिंदू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर भाष्य केले होते. जे स्वत:ला हिंदू म्हणवतात, ते 24 तास हिंसा-द्वेष पसरवतात, असे राहुल यांनी आपल्या भाषणात म्हटले होते. राहुल गांधींच्या या विधानावर पंतप्रधान मोदींनीही आक्षेप घेत संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणे ही गंभीर बाब असल्याचे म्हंटले होते.राहुल गांधी यांच्या लोकसभेतील भाषणातील काही शब्द कार्यवाहीतून वगळण्यात आले आहेत.
राहुल गांधी यांनी सोमवारी विरोधी पक्षनेते म्हणून पहिले भाषण केले. भाजपवर निशाणा साधत राहुल गांधी म्हणाले, ‘जे स्वत:ला हिंदू म्हणवतात, ते चोवीस तास हिंसा, द्वेष आणि खोटे बोलत राहतात, ते मुळीच हिंदू नाहीत. सत्याच्या पाठीशी उभे राहावे आणि सत्यापासून कधीही मागे हटू नये असे हिंदू धर्मात स्पष्टपणे लिहिलेले आहे. तसेच अहिंसेचा प्रसार झाला पाहिजे. राहुल यांच्या वक्तव्यावर पीएम मोदींनी आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर राहुल गांधी यांच्या लोकसभेतील भाषणामधील अनेक टिप्पण्या कामकाजातून हटवण्यात आल्या आहेत.
राहुल गांधींच्या ‘हिंदू’ बाबतच्या वक्तव्याबाबत सर्व स्तरांमधून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. तसेच लोकसभा चर्चेदरम्यान राहुल गांधी यांच्या इतर वक्तव्यांना पण कात्री लावण्यात आली. भाजप अल्पसंख्यांक समाजासोबत अनुचित व्यवहार करत असल्याचे वक्तव्य काढण्यात आले. तर अग्निवीर ही सैन्य दलाची नाहीतर पीएमओची योजना आहे अशी त्यांची वक्तव्ये रेकॉर्डवरुन हटवावी लागली आहेत.