झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतल्याच्या काही दिवसांनंतर, हेमंत सोरेन (Hemant Soren ) यांनी आज राज्य विधानसभेच्या विशेष अधिवेशनात फ्लोअर टेस्ट जिंकत आपल्याकडे बहुमत असल्याचे सिद्ध केले आहे.
हेमंत सोरेन यांनी त्यांच्या बाजूने ४५ आमदारांची मते घेऊन विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यांनी झारखंडचे 13वे मुख्यमंत्री म्हणून रांचीच्या राजभवनात 4 जुलै रोजी शपथ घेतली होती.
नामनिर्देशित सदस्य जोसेफ पी गालास्टॉन यांच्यासह एकूण 45 आमदारांनी विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने मतदान केले.
आज भाजप आमदारांनी आमदार भानू प्रताप साही यांना बोलण्याची परवानगी देण्यासाठी सभापती रवींद्र नाथ महतो यांची परवानगी मागितली, परंतु सभापतींनी ती फेटाळली.मतमोजणी सुरू होताच भाजप आणि AJSU आमदारांनी सभागृहातून वॉकआउट केले. भाजपच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षाकडे स्वतःचे 24 आणि AJSU पक्षाचे तीन आमदार आहेत.
मतदानावेळी विधानसभेत 75 आमदार उपस्थित होते. तर अपक्ष आमदार सरयू रॉय हे मतदानापासून दूर राहिले.
सत्ताधारी आघाडीत जेएमएम, काँग्रेस आणि आरजेडीचा समावेश आहे तर सीपीआय (एमएल) लिबरेशनच्या एकमेव आमदाराने बाहेरून पाठिंबा दिला आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर, झारखंड मुक्ती मोर्चाचे 27, काँग्रेसचे 17 आणि राष्ट्रीय जनता दलाच्या एका आमदारासह 81 सदस्यीय सभागृहात JMM-नेतृत्वाखालील आघाडीचे संख्याबळ 45 इतके कमी झाले आहे.
दोन JMM आमदार – नलिन सोरेन आणि जोबा माझी – आता खासदार आहेत, तर जामाच्या आमदार सीता सोरेन यांनी भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी राजीनामा दिला.
तर जेएमएमने आणखी दोन आमदार – बिशूनपूरचे आमदार चमरा लिंडा आणि बोरिओचे आमदार लोबिन हेम्ब्रोम यांना पक्षातून काढून टाकले.
त्याचप्रमाणे, भाजपचे दोन आमदार धुलू महतो (बाघमारा) आणि मनीष जैस्वाल (हजारीबाग) – आता खासदार असल्याने विधानसभेतील भाजपचे संख्याबळ 24 वर आले आहे. मांडूचे आमदार जयप्रकाश भाई पटेल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपने त्यांची हकालपट्टी केली होती.
81 सदस्यीय झारखंड विधानसभेचे सध्याचे संख्याबळ 76 आहे. हेमंत सोरेन यांनी 3 जुलै रोजी सरकार स्थापन करण्याचा दावा केला तेव्हा सत्ताधारी JMM-काँग्रेस-RJD आघाडीने 44 आमदारांची समर्थन यादी राज्यपालांकडे सुपूर्द केली होती.
जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात झारखंड उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर हेमंत सोरेन यांची 28 जून रोजी बिरसा मुंडा तुरुंगातून सुटका झाली. 31 जानेवारी रोजी अटक होण्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जानेवारीमध्ये कथित जमीन घोटाळा आणि मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली होती.
हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतलेल्या चंपाई सोरेन यांनी शपथ घेतल्यानंतर अवघ्या पाच महिन्यांतच पदाचा राजीनामा दिला आणि हेमंत सोरेन यांनी बुधवारी पुन्हा पदभार स्वीकारला. चंपाई सोरेन यांनी या वर्षी २ फेब्रुवारी रोजी राजभवनात झारखंडचे १२ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती.