केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार एमव्ही प्रेस्टीज फाल्कन या तेल टँकरमधून सुटका करण्यात आलेले आठ भारतीय नागरिक किनाऱ्यावर पोहोचले आहेत आणि त्यांची सध्या काळजी घेतली जात आहे.
तर दुर्दैवाने, एका भारतीय क्रू सदस्याचा मृतदेह सापडला आहे. भारत सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि पीडित कुटुंबांना शक्य ती सर्व मदत करण्यात येत आहे.
१५ जुलै रोजी एमव्ही प्रेस्टिज फाल्कन बुडाल्यापासून ओमानच्या किनारपट्टीवर शोध आणि बचाव मोहिमेचे नेतृत्व भारतीय नौदलाची युद्धनौका आयएनएस तेग करत आहे. आतापर्यंत, या बचाव मोहिमेत अपघातग्रस्त जहाजातून नऊ क्रू सदस्यांना यशस्वीरित्या बाहेर काढले आहे, ज्यात आठ जणांचा समावेश आहे. भारतीय तर एक श्रीलंकेचा नागरिक आहे. नौदल आणि ओमानी अधिकारी उर्वरित बेपत्ता क्रू सदस्यांना शोधण्यासाठी कार्य करत आहेत.
ओमानच्या आग्नेय दिशेला सुमारे २५ नॉटिकल मैल अंतरावर झालेल्या एमव्ही प्रेस्टिज फाल्कनच्या पलटीनंतर, भारतीय नौदलाने वेगाने शोध आणि बचाव मोहीम सुरू केली. धोक्याच्या पाण्यात अडकलेल्या क्रूला शोधण्यासाठी आणि मदत करण्यासाठी प्रगत उपकरणे आणि कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
भारतीय नौदलाने सांगितले की, “शोध आणि बचाव मोहिमेदरम्यान एमव्ही फाल्कन प्रेस्टिजमधील 9 क्रू मेंबर्स (8 भारतीय आणि 1 श्रीलंकन) जिवंत सापडले आहेत. उर्वरित क्रू मेंबर्सना शोधण्यासाठी शोध आणि बचाव कार्य परिसरात सुरू राहील.”भारतीय नौदलाचे लांब पल्ल्याचे सागरी शोध विमान P8I देखील वाचलेल्यांच्या शोधात सामील आहे.
केंद्रीय मंत्री कीर्ती वर्धन सिंग यांनी आठ भारतीय नागरिकांची यशस्वी सुटका झाल्याबद्दल दिलासा व्यक्त केला आणि मृत चालक दलातील सदस्याच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला. बचाव कार्यात केलेल्या प्रयत्नांसाठी त्यांनी भारतीय आणि ओमानी दोन्ही अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत. .
“एमव्ही प्रेस्टीज फाल्कन या पलटलेल्या जहाजाबद्दल अपडेट मिळवण्यासाठी ओमानमधील आमचे राजदूत अमित नारंग यांच्याशी बोललो. आयएनएस तेगने वाचवलेले 8 भारतीय किनाऱ्यावर पोहोचले आहेत आणि त्यांची काळजी घेतली जात आहे, हे ऐकून समाधान वाटले. 1 भारतीय व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. आम्ही परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करत आहोत आणि या प्रक्रियेत सहभागी असलेल्या भारत आणि ओमानमधील सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानतो,” सिंग यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे.
ओमानमधील भारतीय दूतावास ओमानी अधिकाऱ्यांच्या सहकार्याने शोध आणि बचाव कार्यात समन्वय साधण्यात सक्रिय सहभाग घेत आहे.