पुणे जिल्ह्यात अत्यंत मुसळधार पाऊस सुरू आहे. खडकवासला धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस होत असल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जात आहे.मुठा नदीपात्रात होत असलेल्या विसर्गामुळे सोलापूरमधील उजनी धरण देखील पूर्णपणे भरले आहे. पूर्ण क्षमतेने धरण भरल्याने उजनी धरणातून देखील मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग केला जात आहे. उजनीतून ८० हजार क्युसेक विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सोलापूरसह अनेक भागांची तहान भागवणारे उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. उजनी धरणात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग हा १ लाख ६० क्युसेक इतका आहे. भीमा नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याची अवाक वाढली आहे. चंद्रभागा नदीत देखील पाण्याची पातळी वाढताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. विसर्ग वाढवण्यात आल्याने चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत आहे. पंढरपूरला पुराचा धोका निर्माण झाला आहे.
पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत आहे. आज सकाळपासून पावसाने थोडीशी विश्रांती घेतल्याने खडकवासला धरणातून देखील पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाणी देखील ओसरण्यास हळू हळू सुरुवात झाली आहे. वीर धरणातून देखील पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने चंद्रभागा नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.