Kolkata Rape Murder Case : कोलकाता येथील कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि खून प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली आहे. सीजेआई डीवाई चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील NA खंडपीठ या प्रकरणाची सुनावणी करत आहे.
कोलकाता बलात्कार व खून प्रकरणावरून सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. या प्रकरणावर झालेल्या सुनावणीवेळी त्यांनी पश्चिम बंगाल सरकारला धारेवर धरताना देशभरातील महिला व युवा डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे.
कोलकाता येथील घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. विविध भागातील हजारो लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत, तसेच देशभरातील डॉक्टरांनी संप पुकारला, या प्रकरणी मंगळवारी झालेल्या सुनावणीत कोर्टाने देशभरातील डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
काय म्हणाले सरन्यायाधीश?
या सुनावणीत सरन्यायाधीश म्हणाले, हा केवळ कोलकाता येथील मुद्दा नसून देशभरातील डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा आहे. ड़ॉक्टरांनी आंदोलन थांबवावे आणि कामावर परतावे, त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही आहोत. हा राष्ट्रहिताचा मुद्दा असून आमच्यावर विश्वास ठेवा, असे आवाहन सरन्यायाधीश चंदचूड यांनी यावेळी डॉक्टरांना केले.
महिला व युवा डॉक्टरांच्या सुरक्षेविषयी आम्हाला चिंता आहे. रुग्णालयांमध्ये ड्यूटी रूम नसते, असे निदर्शनास आले आहे. त्यांच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण तयार करण्यासाठी एक प्रोटोकॉल हवा. सर्व इंटर्न, निवासी डॉक्टर आणि प्रामुख्याने महिला डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. हा प्रोटोकॉल केवळ कागदावर राहू नये, असेही सरन्यायाधीश म्हणाले.
बंगाल सरकार तसेच प्रशासनाच्या कामावर अनेक प्रश्न उपस्थित
सरन्यायाधीशांनी सुनावणीदरम्यान बंगाल सरकार आणि रुग्णालय प्रशासनाला देखील चांगलेच धारेवर धरले आहे. यावेळी कोर्टाने अनेक प्रश्नांचा भडिमार केला. प्राचार्य संदीप घोष काय करत होते, वेळेत गुन्हा दाखल का झाला नाही, आई-वडिलांना पीडितेचा मृतदेह उशिरा का दिला, पोलिस काय करत होते, गंभीर गुन्हा असताना आंदोलनकर्त्यांना रुग्णालयात कसे घुसू दिले, असे अनेक प्रश्न करत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी बंगाल पोलिसांच्या सुरूवातीच्या तपासावर साशंकता व्यक्त केली.