Pooja Khedkar : महाराष्ट्र केडरच्या माजी प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकरला पुन्हा दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाने त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी करताना त्यांच्या अटकेला स्थगिती दिली आहे. या प्रकरणी आज सुनावणी झाली. दिल्ली उच्च न्यायालयाने निलंबित प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या अटकेवर अंतरिम स्थगिती दिली आहे. आता पूजा खेडकरच्या अटकेवर २९ ऑगस्टपर्यंत स्थगिती राहणार आहे.
29 ऑगस्टपर्यंत सुनावणी का पुढे ढकलली?
पूजा खेडकरवर तिच्या यूपीएससी अर्जात तथ्ये चुकीची मांडण्याचा आणि केंद्रीय लोकसेवा आयोगासमोर (UPSC) चुकीची माहिती दिल्याचा आरोप आहे. तत्काळ अटकेची गरज नसल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान तपास यंत्रणेला अटक न करण्याचे निर्देश दिले होते. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांनी निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन याचिकेवरील सुनावणी २९ ऑगस्ट २०२४ पर्यंत पुढे ढकलली असून, दिल्ली पोलिसांचा जबाब अद्याप रेकॉर्डवर नोंदवण्यात आला नसल्याने कारण देण्यात आले आहे. पूजा खेडकरचे वकील सिद्धार्थ लुथरा यांनीही यूपीएससीच्या प्रतिसादाचे पुनरावलोकन करण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्याची विनंती न्यायालयाला केली.
यापूर्वी काय झाले?
UPSC ने पूजा खेडकर विरुद्ध UPSC परीक्षेत बनावटगिरी आणि फसवणूक केल्याचा आरोप करत एफआयआर दाखल केला होता, त्यानंतर पोलीस पूजा खेडकरला अटक करणार होते. दरम्यान, पूजा खेडकरने पटियाला हाऊस कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. ज्यावर न्यायालयाने 1 ऑगस्ट रोजी अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला होता. त्यानंतर पूजा खेडकर यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 12 ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीत दिल्ली उच्च न्यायालयाने 21 ऑगस्टपर्यंत अटकेला स्थगिती दिली होती. याशिवाय यूपीएससी आणि दिल्ली पोलिसांकडून अनेक प्रश्नांची उत्तरे मागवण्यात आली होती. त्याच्या तपासाची व्याप्ती वाढवण्याची गरज असल्याचेही सांगण्यात आले होते. पूजा खेडकरला यूपीएससी परीक्षेसाठी आतून कोणी मदत करत होते का, याचाही तपास व्हायला हवा. असे कोर्टाने म्हंटले होते.