Haryana Assembly Election : येत्या महिन्यात हरियाणामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोगाने नुकत्याच तारखा जाहीर केल्या असून, राज्यातील सर्व 90 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. हरियाणामधील मतदान 1 ऑक्टोबरला होणार असून 4 ऑक्टोबरला याचे निकाल लागणार आहेत. दरम्यान, हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख बदलण्याची मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे.
एकीकडे सर्व राजकीय पक्षांनी या निडणुकीसाठी तयारी सुरु केली आहे. तर दुसरीकडे भाजपने निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. अशातच आता हरियाणा निवडणूक चर्चेत आली आहे.
निवडणूक आयोगाला पत्र लिहून निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी!
हरियाणा भाजपचे अध्यक्ष मोहनलाल बडोली यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून मतदान कमी होण्याच्या भीती व्यक्त केली आहे. अशास्थितीत 1 ऑक्टोबर ही मतदानाची तारीख बदलण्याची विनंती केली आहे. 1 ऑक्टोबरच्या मतदानाच्या आधी आणि नंतर अनेक सुट्ट्या आहेत, त्यामुळे कमी मतदान होऊ शकते, त्यामुळे ही तारीख बदलली पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे.
मोहनलाल बडोली यांनी आयोगाला पत्र लिहून 1 ऑक्टोबर रोजी मतदानाच्या आधी आणि नंतर सुट्या पडत असल्याचे म्हटले आहे. या सुट्यांमुळे लोक बाहेर फिरायला जाऊ शकतात. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होऊ शकतो. या आधारावर त्यांनी निवडणूक आयोग आणि हरियाणाच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना मतदानाची तारीख बदलण्याची विनंती केली आहे.
1 ऑक्टोबरच्या आधी आणि नंतर अनेक सुट्ट्या
28 तारखेला शनिवार आणि 29 तारखेला रविवार, 30 तारखेला सोमवार म्हणजेच कामाचा दिवस असून मंगळवार, 1 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असल्याचे त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीची सुट्टी आहे, तर 3 ऑक्टोबरला अग्रसेन जयंतीची सुट्टी आहे. अशा परिस्थितीत हा 6 दिवसांचा लाँग वीकेंड असल्याने लोक सुट्टीवर जाऊ शकतात. म्हणून निवडणूका पुढे ढकलण्याची मागणी भाजपने केली आहे.
यावरच आता हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी, “निवडणुका जाहीर झाल्या आहेत आणि त्याची घोषणा होऊन एक आठवड्याहून अधिक काळ लोटला आहे. मात्र भाजपला ही निवडणूक पुढे ढकलायची आहे. त्यांना पराभव स्वीकारायचा नाहीये म्हणून ते निडणूका पुढे ढकलण्याची मागणी करत आहेत.’ असे त्यांनी म्हंटले आहे.
2019 च्या विधानसभा निवडणूक
गेल्या वेळी म्हणजे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत एकाच टप्प्यात मतदान झाले होते. त्यानंतर 21 ऑक्टोबर 2019 रोजी हरियाणा विधानसभेच्या सर्व जागांसाठी मतदान झाले. 24 ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. 2019 च्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत 68.20 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
हरियाणा विधानसभा निवडणुकीत 2019 मध्ये 36.7 टक्के मतांसह 40 जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. तेव्हा काँग्रेसला २८.२ टक्के मते मिळाली होती आणि ३१ जागांसह पक्ष दुसऱ्या क्रमांकावर होता. दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पक्षाने (जेजेपी) 14.9 टक्के मतांसह 10 जागा जिंकल्या, तर हरियाणा लोकहित पक्षाने एक टक्क्यांपेक्षा कमी मतांसह एक जागा जिंकली.