Supriya Sule : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बांधण्यात आला होता. या पुतळ्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. परंतु मंगळवारी हा पुतळा कोसळला आहे. या घटनेवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले.
अवघ्या आठ महिन्यातच पुतळा कोसळल्याने विरोधकांकडून यावर जोरदार टीका केली जात आहे. त्यातच आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीमध्ये रस्त्यावर उतरुन आंदोलन करत निषेध व्यक्त केला आहे.
महाविकास आघाडीच्या वतीने राज्यातील बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती व महिलांवरील वाढत्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी बारामतीत आज तीन हत्ती चौकात हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी सुप्रिया सुळे यांनी तीन मागण्या केल्या. पहिली म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा, बदलापूर घटनेतील आरोपीला फाशी, तसेच छत्रपती महाराजांचा पुतळ्याबाबत ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट केलं त्यांची चौकशी.
मालवण मधील घटनेवर सुप्रिया सुळे म्हटल्या, “मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळयाबाबत झालेली घटना ही वेदनादायी आणि दुःखदायक आहे. राज्यात कॉन्ट्रॅक्टर लॉबीच ‘लाडकी’ झाली आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्वांवर कडक कारवाई व्हायला हवी,” पुढे त्यांनी, सरकारने आमच्या दैवताचा अपमान करू नये. असे म्हंटले
बारामतीमधील आजच्या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष, कॉंग्रेस, ‘आप’सह महाविकास आघाडीतील घटक पक्ष सहभागी झाले होते.