देशभरात महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. खाद्य पदार्थापासून पेट्रोल, डिझेल आणि इंधनांचे दर गगनाला भिडत चालले आहेत. या महागाईच्या काळात सर्वसामान्य माणूस होरपळून निघत आहे. असे असतानाच पुढच्या महिन्यात सर्वसामान्यांना दिलासा मिळेल असे सांगण्यात आले आहे. कारण पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
स्वस्त क्रूडच्या उपलब्धतेमुळे देशातील तेल विपणन कंपन्या पेट्रोल, डिझेल आणि एटीएफच्या किमती कमी करू शकतात अशी माहिती दिली जात आहे. सौदी अरेबिया हा देश आशियामध्ये कच्च्या तेल उत्पादक देशांपैकी सर्वात मोठा देश आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत घट करण्याचा निर्णय हा देश घेऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. हा निर्णय घेतला तर भारतासाठी तो अधिक फायदेशीर ठरू शकतो. स्वस्त दरात कच्च्या तेल उपलब्ध झाल्यास पेट्रोल, डिझेल आणि एटीएफच्या किमती कमी करण्याचा निर्णय तेल विपणन कंपण्याकडून घेतला जाईल.
अरब लाईट क्रूडची अधिकृत विक्री किंमत ऑक्टोबरमध्ये प्रति बॅरल 50 ते 70 सेंट्सनं घसरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे . चीनकडून सातत्याने क्रूड ऑईलची मागणी कमी होत आहे. यावरूनच चीनमधील रिफायनिंग मार्जिन कमकुवत झाल्याचे समजते. तेथील उत्पादन आणि रिअल इस्टेट क्षेत्रात मंदी असल्यानेच क्रूड ऑईलच्या किमतींत घट केली असेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
दररोज राष्ट्रीय तेल कंपन्याकडून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सांगितल्या जातात अनेकदा यामध्ये बदल देखील झालेले असतात. आज 4 सप्टेंबर 2024 रोजी पेट्रोल आणि डिझेलची किंमत घसरल्याचे दिसून येत आहे. आज तेलाची किंमत 74 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचली आहे.आज आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड 73.44 डॉलर प्रति बॅरलअसून WTI क्रूड 70.00 डॉलर प्रति बॅरल इतक्या किमतीचे आहे.