J&K Election 2024 : 2024 च्या जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. भारतीय जनता पक्षही आपल्या तयारीत व्यस्त आहे. जम्मू-काश्मीरमध्ये तिकीट वाटपावरून भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे.
अशातच आता 6 सप्टेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे जम्मू-काश्मीर दौऱ्यावर जाणार आहेत. जम्मू-काश्मीरला भेट देऊन ते विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार आहेत.
गृहमंत्री अमित शहा 6 सप्टेंबर रोजी जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत. तसेच त्यांच्या दौऱ्यामुळे राज्यात भाजपच्या प्रचारालाही वेग येणार आहे. शाह शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास जम्मूला पोहोचतील आणि शहरातील भाजपच्या मीडिया सेंटरमध्ये पक्षाचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करतील.
तयारीची आढावा बैठक
पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू दौऱ्याच्या पहिल्या दिवशी गृहमंत्री राज्य भाजपच्या मुख्य गटाची भेट घेतील आणि पक्षाच्या निवडणुकीची तयारी आणि हालचालींची माहिती घेतील. त्याचबरोबर दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी गृहमंत्री जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुका यशस्वी करण्यासाठी प्रशासनाची तयारी आणि सुरक्षा व्यवस्थेबाबत बैठकही घेऊ शकतात.
जम्मू काश्मीरमध्ये कधी होणार मतदान?
जम्मू-काश्मीरमध्ये 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबरला तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. तर 8 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये 90 विधानसभा मतदारसंघ आहेत, त्यापैकी 7 जागा अनुसूचित जातीसाठी (एससी) आणि 9 जागा अनुसूचित जमातीसाठी (एसटी) राखीव आहेत.