Mohan Bhagwat : कोलकात्याच्या आरजी कर हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरसोबत झालेल्या अत्याचारानंतर देशभरातून संताप व्यक्त होत आहे. ममता बॅनर्जी सरकारवरही सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता या प्रकरणावर आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. सरकारने दोषींचा शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा द्यावी, असे मोहन भागवत यावेळी म्हणाले आहेत.
काय म्हणाले मोहन भागवत?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत दोन दिवसांच्या कोलकाता दौऱ्यावर आहेत. दरम्यान, रविवारी सायंकाळी बडा बाजारातील एका कार्यक्रमादरम्यान मोहन भागवत यांना आरजी कर रुग्णालयातील घटनेबाबत प्रश्न विचारला असता, त्यांनी या घटनेबाबत समाजातील लोकांच्या भावनांचा आदर असल्याचे सांगितले. सरकारने दोषींना लवकरात लवकर शोधून कठोर शिक्षा द्यावी. अशी मागणी केली.
8-9 ऑगस्टच्या रात्री आरजी कर हॉस्पिटलमध्ये एका महिला डॉक्टरवर अत्याचार झाल्याचीबातमी समोर आली होती. त्यानंतर या प्रकरणी संजय रॉय या आरोपीला अटक करण्यात आली. या घटनेचा देशभरातील डॉक्टरांनी निषेध केला होता. या प्रकरणाने ममता सरकारलाही घेरल्याचे दिसून आले. सध्या सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे.
ममतांना दिला सल्ला
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना देखील सल्ला दिला. यावेळी ते म्हणाले, ‘ममता बॅनर्जी यांनी कोलकाता बलात्कार हत्याकांडावर मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली पाहिजे. बंगाल सरकारनेही या घृणास्पद गुन्ह्यातील दोषींना कठोर शिक्षा द्यावी.” असे त्यांनी सांगितले.
ममतांच्या राजीनाम्याची मागणी
दरम्यान, कोलकाता बलात्कार हत्याप्रकरणी न्यायाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. बंगालच्या रस्त्यावर रोज लाखो लोक निदर्शने करत आहेत. या प्रकरणी नागरिकांनी सरकारला देखील घेरले आहे, तसेच यावेळी ममतांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या प्रकरणात सत्तेतील काही लोकं गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप बंगाल सरकारवर करण्यात आला आणि यामुळेच ममतांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे.