पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सोमवारी न्यूयॉर्कमध्ये युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांच्याशी द्विपक्षीय बैठक घेतली. याआधी 23 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युक्रेनला भेट दिली होती. फेब्रुवारी 2022 मध्ये सुरू झालेल्या युक्रेन संघर्षात लवकरात लवकर शांतता प्रस्थापित करण्यासाठी योगदान देणारे नवीन उपाय विकसित करण्यासाठी भारताने तयारी दाखवलेली आहे. युक्रेनमध्ये सुरू असलेला संघर्ष थांबवून त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी युक्रेन दौऱ्यावर होते. यावरूनच आता युक्रेन संघर्षात शांततेच्या प्रयत्नांसाठी राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत अशी माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी दिली आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट झाल्यानंतर या भेटीबाबत संयुक्त निवेदन जारी करण्यात आले आहे. या संयुक्त निवेदनात सांगण्यात आले आहे की, या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यामध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली आहे. अनेक राज्यांच्या सार्वभौमत्वाचा आदर करणे. तसेच आंतरराष्ट्रीय कायद्याच्या तत्त्वांचे समर्थन करण्याचा उद्देश समोर ठेऊन त्यासाठी सहकार्याची तयारी करणार असल्याच्या चर्चा या भेटीदरम्यान झाल्या आहेत असे निवेदनात सांगण्यात आले आहे.
तसेच या बैठकीत द्विपक्षीय मुद्द्यांवर तसेच रशिया-युक्रेन संघर्षाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. यूक्रेनच्या भेटीपासून पंतप्रधान रशियाचे अध्यक्ष पुतिन आणि अमेरिकेचे अध्यक्ष बिडेन यांच्या संपर्कात आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनीही नुकताच रशियाचा दौरा केला आहे अशी माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्सवर याबाबत पोस्ट केली आहे ते या पोस्टमध्ये म्हणाले आहेत की, “न्यूयॉर्कमध्ये राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची मी भेट घेतली आहे. युक्रेनमधील संघर्ष लवकर सोडवण्यासाठी आणि शांतता आणि स्थिरता प्रस्थापित करण्यासाठी भारताकडून नेहमीच योगदान राहील. तसेच शांततेच्या मार्गावर पुढे जाण्याबाबत आपण नेहमीच रशिया-युक्रेन देशांना सल्ला दिला आहे. तसेच याबाबत अनेक देशांच्या नेत्यांशी चर्चा देखील केली आहे. लवकरात लवकर रशिया-युक्रेन युद्ध थांबले पाहिजेत असे सर्वांचे मत आहे असे पंतप्रधानांनी सांगितले आहे.