Donald Trump : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत एक मोठी माहिती समोर येत आहेत. इराण त्यांच्या हत्येचा कट रचत असल्याची अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी भीती व्यक्त केली आहे. अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी ट्रम्प यांच्यावर प्राणघातक हल्ल्याची भीती व्यक्त केली असून त्यांना सावध राहण्यास सांगितले आहे. तुमच्या माहितीसाठी अलीकडच्या काळात ट्रम्प यांच्यावर दोन वेळा हत्येचा प्रयत्न झाला आहे.
ट्रम्प यांच्या टीमने मंगळवारी याबद्दल माहिती देत सांगितले, ‘माजी अध्यक्ष ट्रम्प यांना इराणकडून संभाव्य धोक्याबद्दल गुप्तचर संचालकांच्या कार्यालयाने माहिती दिली आहे. गुप्तचर संचालकांच्या कार्यालयाचे म्हणणे आहे की, ‘अमेरिकेत अस्थिरता पसरवण्यासाठी इराण ट्रम्प यांची हत्या करू शकतो.’
गुप्तचर अधिकाऱ्यांनी गेल्या काही महिन्यांत ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यांची ओळख पटल्याचे देखील सांगितले. सर्व एजन्सी आणि तपास अधिकारी ट्रम्प सुरक्षित राहतील आणि नोव्हेंबरमध्ये होणारी निवडणूक कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय पार पडावी यासाठी काम करत असल्याचे देखील सांगितले.
ट्रम्प यांच्यावर दोनदा हल्ला
आगामी निवडणुकीसाठी 13 जुलै रोजी पेनसिल्व्हेनियातील बटलर येथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यादरम्यान ट्रम्प जनतेशी संबोधित करत असताना त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला, भाषणादरम्यान एका तरुणाने ट्रम्प यांच्यावर गोळीबार केला होता. गोळी ट्रम्प यांच्या कानाला लागली या हल्ल्यात ट्रम्प थोडक्यात बचावले होते. 15 सप्टेंबर रोजी देखील असेच काहीसे घडले. ट्रम्प यांच्यावर दुसरा हल्ला फ्लोरिडा येथील वेस्ट पाम बीच येथे झाला. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक देखील करण्यात आली आहे.
दरम्यान, ट्रम्प यांच्या टीमने मंगळवारी सादर केलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, ‘ट्रम्प अमेरिकन लोकांसाठी लढण्याच्या आणि अमेरिकेला पुन्हा महान बनवण्याच्या त्यांच्या मार्गात कोणतीही अडचण येऊ देणार नाहीत.’ तसेच या निवेदनात विरोधी पक्षावर हल्ला करत कमला हॅरिस या इराणचे समर्थन करत असल्याचे देखील म्हंटले आहे.
तुमच्या माहितीसाठी अमेरिकेत 5 नोव्हेंबरला राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचा सामना डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्याशी होणार आहे. जो बायडेन यांनी माघार घेतल्यानंतर कमला हॅरिस यांना तिकीट मिळाले.