Ravikant Tupkar : शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. बुलढाणा पोलिसांनी तुपकरांवर कलम ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून जिल्हा कृषी अधीक्षकांच्या कार्यालयातून त्यांना अटक करण्यात आली आहे. पिकविम्यासाठी रविकांत तुपकरांनी बुलढाणा जिल्हा कृषी अधीक्षकांच्या कक्षात ठिय्या आंदोलन सुरु केले होते. याचवेळी त्यांना अटक करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तुपकर पुन्हा एकदा आक्रमक दिसून आले. यावेळी त्यांनी पिक विम्यासाठी बुलढाणा जिल्हा कृषी अधीक्षकांच्या कक्षात ठिय्या आंदोलन सुरु केले. जोपर्यंत पीकविम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नाही, तोपर्यंत जिल्हा कृषी अधीक्षक कक्षात मुक्काम ठोकणार असल्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला होता. मला गोळ्या घातल्या तरी शेतकऱ्यांसाठी लढत राहणार. सरकारच्या हुकूमशाहीचा आम्ही निषेध करतो, असं देखील रविकांत तुपकर यावेळी म्हणाले.
तसेच शेतकऱ्यांनी गावागावात आंदोलन सुरू करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. बुलढाणा जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात तुपकरांनी आंदोलन सुरु करत जिल्हा कृषी अधिक्षकांना चांगलेच फैलावर घेतले. मात्र, त्यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या हक्काचा पिकविमा मागणाऱ्या रविकांत तुपकरांवर गुन्हा दाखल करता मग शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल का करत नाहीत? असा सवाल यावेळी ऍडव्होकेट शर्वरी तुपकर यांनी उपस्थित केला.