आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Vidhansabha Elections 2024) राजकीय वर्तुळात अनेक आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह (Amit Shah) 1 किंवा 2 ऑक्टोबरला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा अतिशय महत्वाचा मानला जात आहे. यापूर्वी अमित शाह यांनी विदर्भ , मराठवाडा दौरा देखील केला आहे. मिशन मुंबई ठरवत विधानसभा निवडणुकीसाठी या दौऱ्यात अमित शाह यांच्याकडून खास रणनिती आखली जाणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त डॉ.सुखबीर सिंह संधू , निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार यांचे शिष्टमंडळ मुंबईत हजर झाले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, मुख्य निवडणूक अधिकारी, मुख्य सचिव तसेच राज्यातील विविध अंमलबजावणी अधिकारी यांच्यासोबत आढावा बैठक घेण्यात येणार आहे अशी माहिती मिळालेली आहे. यानंतर पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाकडून आगामी विधानसभा निवडणूकीची घोषणा करण्यात येईल अशी शक्यता वर्तवली जाता आहे.
दरम्यान, अमित शाह मुंबईतील सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाची माहिती घेण्याचे आदेश भाजप पदाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. तीन दिवस ही माहिती जमा केली जाणार असून याचा रीपोर्ट अमित शाह यांना देण्यात येणार आहे. हा रीपोर्ट मिळाल्यानंतर अमित शाह यांची काय प्रतिक्रिया असेल याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत विजय मिळावा यासाठी जोमाने काम करा, आळस झटकून कामाला लागा असा सल्ला अमित शाह यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.