Economic Crisis : पर्यटकांचे आकर्षण म्हंटल्या जाणाऱ्या मालदीवची आर्थिक स्थिती खूप बिकट (Economic Crisis) होत चालली असल्याचे सांगण्यात येत आहेत. देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून, सरकारकडे कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठीही पैसे नसल्याची माहिती समोर अली आहे.
मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू सरकारने या महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी बँक ऑफ मालदीवकडून 800 दशलक्ष (80 कोटी) रुपयांचे कर्ज घेतले असल्याचे समजत आहे. यासंबंधीची माहिती एका अहवालात देण्यात आली आहे.
एका प्रसिद्ध अहवालानुसार, नॅशनल बँकेने मालदीवच्या वित्त मंत्रालयाला MVR 800 दशलक्ष कर्ज दिले आहे. कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी सरकारने हे कर्ज घेतल्याचेही या अहवालात सांगण्यात आले आहे. दरम्यान, मालदीवच्या आर्थिक स्थितीबाबत तज्ज्ञांनी देखील इशारा दिला आहे. ही बातमी अशा वेळी आली आहे जेव्हा भारताने 50 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी मालदीवला एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे.
मालदीवला गेल्या महिन्यातच US$ 50 दशलक्ष कर्जाची परतफेड करायची होती, परंतु आर्थिक संकटामुळे मालदीवचे अध्यक्ष मुइज्जू यांनी भारत सरकारला मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. या वर्षी जूनमध्ये मुइज्जू सरकारने आर्थिक संकटावर मात करण्यासाठी खर्चात कपात करण्याची देखील घोषणा केली होती.
मालदीवमधील आर्थिक संकटाला जबाबदार कोण?
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मालदीवमधील आर्थिक संकटामागील कारण सरकारी खर्चात झालेली वाढ आहे. अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच मुहम्मद मुइझू यांनी तुर्कियेकडून ३७ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सला एक ड्रोन विकत घेतला. या वर्षाच्या सुरुवातीला, मालदीवने भारताला 50 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचे कर्ज व्याजासह परत केले होते, जरी त्या वेळी ते परत करण्याचे कोणतेही बंधन नव्हते.
खरं तर गेल्या काही महिन्यांपासून मालदीव सोबत भारताचे संबंध चांगल्या स्थितीत नसल्यामुळे मालदीवमध्ये भारतीय पर्यटकांची संख्या देखील कमी झाली आहे. याचा देखील परिणाम मालदीव पर्यटन अर्थव्यवस्थेवर दिसून आला आहे.