Nirmala Sitharaman : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) 17 ते 20 ऑक्टोबर 2024 या कालावधीत पहिल्यांदा मेक्सिकोला भेट देणार आहेत. त्यानंतर त्या 20 ते 26 ऑक्टोबर दरम्यान अमेरिकेच्या दौऱ्यावर (America Tour) जाणार आहेत. या दौऱ्यांमध्ये अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळही त्यांच्यासोबत असेल. त्यांचा हा दौरा दोन्ही देशांमधील वेगाने वाढणाऱ्या द्विपक्षीय आर्थिक आणि व्यापारी संबंधांना सकारात्मक दिशा देणारा ठरणार आहे.
अर्थ मंत्रालयाने मंगळवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सीतारामन 17-20 ऑक्टोबर दरम्यानच्या मेक्सिकोच्या पहिल्या दौऱ्यादरम्यान अर्थमंत्री रोजेलिओ रामिरेझ डेलाओ यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक देखील घेणार आहेत. याशिवाय संसदीय सहकार्य मजबूत करण्यासाठी आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी त्या मेक्सिकन संसदेच्या अनेक सदस्यांशी चर्चा करतील.
सीतारामन टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) च्या ग्वाडलजारा येथील मुख्यालयालाही भेट देतील. ग्वाडालजाराला ‘सिलिकॉन व्हॅली ऑफ मेक्सिको’ असेही म्हणतात. भारत-मेक्सिको व्यापार आणि गुंतवणूक शिखर परिषदेला अर्थमंत्री निर्मला सीतारामन संबोधित करतील. यात दोन्ही देशातील नामवंत उद्योगपती सहभागी होणार आहेत.
यानंतर अर्थमंत्री 20 ते 26 ऑक्टोबर दरम्यान अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. यादरम्यान, त्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि जागतिक बँकेच्या वार्षिक बैठकांना आणि G20 वित्त मंत्री आणि सेंट्रल बँक गव्हर्नर (FMCBG) च्या चौथ्या बैठकीला उपस्थित राहतील.
येथे त्या FMCBG, G20 पर्यावरण मंत्री आणि परराष्ट्र मंत्र्यांची संयुक्त बैठक आणि G-7 आणि आफ्रिका मंत्रिस्तरीय गोलमेजमध्येही सहभागी होणार आहेत. सीतारामन न्यूयॉर्क शहर आणि वॉशिंग्टन डी.सी. शहरांच्या भेटीदरम्यान न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजमधील पेन्शन फंड राऊंडटेबलमध्ये देखील सहभागी होणार आहेत. येथे त्या पेनसिल्व्हेनिया विद्यापीठ आणि कोलंबिया विद्यापीठाच्या व्हार्टन स्कूलमधील विद्यार्थी आणि प्राध्यापकांशी देखील संवाद साधतील.
आपल्या अमेरिका दौऱ्यात अर्थमंत्री ब्रिटन, स्वित्झर्लंड आणि जर्मनीसह अनेक देशांच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. याशिवाय त्या जागतिक बँक, एशियन डेव्हलपमेंट बँक (ADB), युरोपियन बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट (EBRD) आणि बँकिंग आणि वित्तीय संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत बैठका घेणार आहेत. प्रसिद्ध झालेल्या निवेदनानुसार, सीतारामन एका उच्चस्तरीय कार्यक्रमात जागतिक बँक गट चर्चेतही सहभागी होणार आहेत.