Haryana : हरियाणात लवकरच नवीन सरकार स्थापन होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या उपस्थितीत नायब सैनी यांची हरियाणा भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. नायब सिंग सैनी उद्या हरियाणाचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत अनेक नेते मंत्रीपदाची शपथ घेतील.
नायब सैनी यांच्या नावाची घोषणा करताना अमित शाह म्हणाले की, ‘हरियाणात 36 समुदायांचे सरकार असेल. हरियाणातील प्रत्येक व्यक्तीचा विकास होईल. या बैठकीत नायबसिंग सैनी यांच्या नावावर एकमत झाले आहे. नायब सैनी उद्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. अशी घोषणा अमित शहांनी केली आहे.
भाजप हायकमांडने गृहमंत्री अमित शहा आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांना निरीक्षक बनवले होते. बुधवारी सकाळी दोन्ही निरीक्षक चंदीगडला पोहोचले. मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी पर्यंत अमित शहा आणि मोहन यादव हे हरियाणातच असणार आहेत. हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातच गृहमंत्री अमित शहा यांनी नायब सैनी यांना मुख्यमंत्र्यांचा चेहरा म्हणून घोषित केले होते. भाजपच्या हरियाणातील विजयात एक महत्वाचा मुद्दा हा देखील आहे की, भाजपने आधीच मुख्यमंत्र्यांचा चेहरा घोषित केला होता.
Nayab Singh Saini chosen as leader of Haryana BJP Legislature Party; to take oath as Haryana CM for the second time tomorrow, October 17 pic.twitter.com/t8lJRaUCi0
— ANI (@ANI) October 16, 2024
विशेष म्हणजे, विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हरयाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यासह माजी गृहमंत्री अनिल विज यांनी पुढील मुख्यमंत्रीपदासाठी नायब सिंह सैनी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता.
यानंतर बैठकीत उपस्थित सर्व आमदारांनी एकमताने नायब सैनी यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड केली. आता नायब सैनी राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांची भेट घेऊन हरियाणात सरकार स्थापनेचा दावा करतील. 17 ऑक्टोबर रोजी राज्यपाल नायब सैनी आणि मंत्र्यांना शपथविधीसाठी आमंत्रित करतील.